SIP Calculator : साल २०२५ हे भारतीय शेअर बाजारासाठी कमालीचे चढ-उताराचे ठरले. जागतिक घडामोडी आणि देशांतर्गत कारणांमुळे बाजाराने गुंतवणूकदारांना एका मर्यादित कक्षेत ठेवले. बाजाराच्या या संथ चालीमुळे म्युच्युअल फंड योजनांच्या कामगिरीवरही काहीसा परिणाम झाला असला तरी, शिस्तबद्ध गुंतवणूक करणाऱ्या 'एसआयपी' धारकांसाठी मात्र चित्र आशादायक आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांना एसआयपीने आजही निराश केलेले नाही.
बाजाराच्या हालचाली आणि एसआयपीचा परतावा
म्युच्युअल फंडमधील परतावा पूर्णपणे शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो. बाजारात तेजी असल्यास एसआयपीमधून भरघोस परतावा मिळतो, तर मंदीच्या काळात तात्पुरते नुकसानही सोसावे लागू शकते. एसआयपीमध्ये परतावा कधीही एकसमान नसतो. मात्र, १५ ते २० वर्षांसारख्या प्रदीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास बाजारातील मंदीची जोखीम कमी होते आणि सरासरीचा फायदा मिळतो. एसआयपीमधून मिळणाऱ्या परताव्यावर गुंतवणूकदारांना 'कॅपिटल गेन्स टॅक्स' भरावा लागतो हेही लक्षात असुद्या.
१०,००० रुपयांची एसआयपी केल्यास २० वर्षांत किती संपत्ती?
जर तुम्ही दरमहा १०,००० रुपये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवले, तर २० वर्षांत चक्रवाढ व्याजाच्या जोरावर किती मोठी रक्कम जमा होऊ शकते, याचे दोन टप्प्यांतील गणित समजून घेऊ.
१. १२ टक्के वार्षिक परतावा गृहीत धरल्यास
- एकूण गुंतवणूक : २४ लाख रुपये (२० वर्षे)
- मिळालेला परतावा : सुमारे ६८ लाख रुपये
- एकूण फंड : ९२ लाख रुपये
२. १५ टक्के वार्षिक परतावा गृहीत धरल्यास
- एकूण गुंतवणूक : २४ लाख रुपये
- मिळालेला परतावा : सुमारे १.०८ कोटी रुपये
- एकूण फंड : १.३२ कोटी रुपये
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा सल्ला
शेअर बाजारातील तात्पुरत्या घसरणीला न घाबरता ज्यांनी आपली एसआयपी सुरू ठेवली, त्यांनाच दीर्घकाळात संपत्ती निर्मितीचा लाभ मिळतो. २०२५ मधील सुस्त बाजाराकडे एक संधी म्हणून पाहून गुंतवणूक सुरू ठेवणे हेच यशस्वी गुंतवणूकदाराचे लक्षण आहे.
वाचा - चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
